अखेर तो क्षण जवळ आलेला आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा काही दिवसांवर आलेला आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे राम भक्त संपूर्ण देशामध्ये आनंदोत्सव साजरा करीत आहेत, तर दुसरीकडे काही ठग रामाच्या नावावर लोकांना लुबाडण्याचं काम करत आहेत. राम मंदिरासाठी देणगी स्वरुपात ऑनलाईन पैसे मागवले जात आहेत. सोशल मीडियावर QR कोड शेअर करुन राम मंदिराच्या नावाने पैसे उकळले जात आहेत.
राम मंदिराच्या नावे सुरु असलेल्या गैरप्रकारांबाबत विश्व हिंदू परिषदेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'सायबर गुन्हेगारांनी जाळं टाकलं असून सोशल मीडियावर मेसेज टाकत लोकांकडून पैसे लुटले जात आहेत. मंदिराच्या नावावर देणगी मागण्याचे प्रकार सुरु आहेत. या मेसेजेसमध्ये QR कोड असतो आणि स्कॅन करुन पेमेंट करण्याचं आवाहन केलं जात आहे.'' अशी माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली.
या प्रकरणी गृह मंत्रालय, दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. राम मंदिर निर्माणकार्य करणाऱ्या ट्रस्टने अशा प्रकारे पैशांची मदत मागितलेली नाही. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहिलं पाहिजे असे विनोद बंसल म्हणाले.
दरम्यान, युपीआय नंबरही व्हायरल करण्यात आला आहे. त्यावरुनही भक्तांची फसवणूक करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत विश्व हिंदू परिषदेने म्हटले की, "राम भक्तांची ही फसवणूक म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या अवैध मार्गाने लोकांकडून पैसा उकळला जातोय. पोलिसांनी भक्तांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत." राम मंदिर निर्माणकार्य करणाऱ्या ट्रस्टने अशा प्रकारे पैशांची मदत मागितलेली नाही. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहिलं पाहिजे.