कांदिवली पूर्व येथील अशोक नगर येथील शाळेतून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येत आहे. शाळेतील चार वर्षांच्या मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी शाळेमध्ये काम करणाऱ्या वॉचमनला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी समता नगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली.
वॉचमनने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने वॉशरुममध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर विनयभंग केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, कांदिवली अशोक नगर येथील एका शाळेत शिकणारी 4 वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांसोबत शाळेत गेली होती. मात्र 2 फेब्रुवारीला शुक्रवार जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होऊ लागल्या. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता विनयभंगाची घटना उघडकीस आली. या प्रकारानंतर पालक संतप्त झाले. इतर पालकांनाही या घटनेची माहिती मिळली. सर्वच जण शाळेबाहेर जमा झाले. सध्या शाळेच्या विरोधात पालकांनी भूमिका घेतली. प्रशासनाला मुलींच्या सुरक्षेबाबत जाब विचारला गेला.
पालकांच्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक देखील केली आहे. मात्र, या प्रकरणात शाळेकडून हलगर्जी झाल्याचा आरोप करत पालकांनी आज शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. सध्या पालकांनी आज सकाळपासून शाळेबाहेर रास्ता रोको केला आहे.यावेळी शाळेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आरोपीस फाशी देण्याची मागणी पालक करत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर समता नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.