महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद काही दिवसांपुर्वी बरखास्त करण्यात आली होती. अनेक जिल्हा संघटना व खेळाडूंच्या तक्रारीमुळे भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता यासाठी निवडणुका होणार असून भाजपचे रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे.
महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र चालवणारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका पार पडत असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोघांनी माघार घेतली. यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. भाजपचे खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले आहे.
शरद पवार होते अध्यक्ष
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. परिषदेकडून कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्यात येत नसल्यामुळे बरखास्त करण्यात आल्याचं भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितलं होतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेस महासंघाने 23 आणि 15 वर्षांखालील दोन राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद दिले होते. मात्र, परिषदेने यापैकी एकही स्पर्धा घेतली नाही. त्यामुळे महासंघाने परिषदेला संलग्नता रद्द करण्याचा इशाराही दिला. त्यानंतरही परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही कारवाई केल्याचे भारतीय कुस्ती महासंघातर्फे सांगण्यात आले आहे.