Shiv Sena Against Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना सध्या आक्रमक झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने निदर्शनं करण्यात आली आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांचं आज मुंबईत (Mumbai) आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली असून, ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यामागे संपूर्ण पक्ष खंबीरपणे उभा असल्याचा संदेश देखील देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येतोय.
संजय राऊत विमानतळावरुन थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांशी ते आपल्यावर झालेल्या कारवाईबद्दल तसेच किरीट सोमय्यांवर कारवाई करण्यासंदर्भात बातचीत करणार असल्याचं समजतंय.
संजय राऊत यांनी मुंबई विमानतळातून बाहेर पडताच माध्यमांशी संवाद साधला. ही गर्दी म्हणजे संताप आणि चीड आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे हल्ले महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होत आहेत, हे पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे असं संजय राऊत म्हणाले. मी तर एक फक्त निमित्त आहे, माझ्यासारख्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाया सुरु आहेत, पवार साहेबांनी माझ्या निमित्ताने ही खंत पंतप्रधानांकडे व्यक्त केली असं संजय राऊत पुढे म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणा आम्हाला तुरुंगात पाठवत असेल तर आम्ही तयार आहोत, आमच्यावर खुनी हल्ले केले तरी आम्ही तयार आहोत. मात्र पुढचे 25 वर्ष राज्यात सत्ता येणार नाही असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत हे काही वेळापूर्वीच मुंबई विमानतळावर उतरले असून, शिवसैनिकांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे.
किरीट सोमय्या यांनी युद्धनौका विकांतचं स्मारक बनवण्यासाठी सर्वसामान्य जनतेकडून रेल्वे स्टेशनबाहेर डब्बे वाजवून जमा केलेले सुमारे 57 ते 58 कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी राज्यभवनात जमा केले नसल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याबाबत ईडी, सीबीआयकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नसताना दुष्ट हेतूने संजय राऊत यांच्या संपत्ती वर जप्ती कारवाई केली जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना भिवंडी शहरप्रमुख सुभाष माने व कुंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मागील तीन तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला असताना सुद्धा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांचे कार्यकर्ते हे पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाणे सोडणार नाही, असा पवित्रा या नेत्यांनी घेतला आहे.
बोरिवली पूर्वेमध्ये शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल पार्कच्या समोर आंदोलन करण्यात आलं. INS विक्रांतच्या नावाने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पैसे खाल्ले आहेत त्यामुळे त्यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी या आंदोलनात शिवसेनेने केली आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात या आंदोलनामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे संजय राऊत यांच्यावरील इडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच किरीट सोमय्या यांनी विक्रांत जहाज संवर्धनासाठी गोळा केलेला पैसा राजभवनात जमा केले नसल्याचे समजताच शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे सोमय्या हे देश द्रोही असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केले तसेच त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भारतीय युध्द नौका आय.एन. एस.विक्रांतची देखभाल करण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी अपहार केल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सौमय्या यांचा शिवसैनिकांकडून जाहिर निषेध करण्यात आला. आज कराड शहरातील मुख्य चौकात त्यांच्या विरुद्ध शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारले तसेच त्यांची ही कृती देशद्रोही वृत्तीची असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोध करण्यात आलाय. युद्धनौका विक्रांत प्रकरणात किरीट सोमयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून जोर धरत आहे. यावेळी महामार्गावर ठिय्या मांडून किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर गाढवाच्या गळ्यात देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून आंदोलन केले गेले. या आंदोलनामुळे तब्बल अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. लातूर आणि औरंगाबादकडे जाणारी वाहतूक जवळपास अर्धा तास खोळंबली आहे.