कर्नाटकमधील भाजपा सरकारचे प्रमुख, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचा अग्रलेख सामनातून शिंदे - फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. ठाणे-कल्याणमधील शिवसेनेच्या शाखा, शिवसैनिकांची घरे बळाचा वापर करून ताब्यात घेणे ही मर्दानगी नसून कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांच्या मस्तवाल भाषेस सडेतोड उत्तर देणे व बेळगावात घुसून मराठीजनांच्या पाठीशी उभे राहणे हेच शिवरायांच्या महाराष्ट्राचे शौर्य आहे, पण आज महाराष्ट्रात या शौर्याचा व मर्दानगीचा दुष्काळ पडल्यानेच बेळगावमधील मराठी सीमा बांधवांच्या छाताडावर पाय ठेवून कानडी मुख्यमंत्र्यांनी आज सांगलीतील जत व सोलापुरातील अक्कलकोटवर दावा सांगितला आहे.महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या खोके सरकारात जीव नाही. मनगटात सळसळ नाही. लढण्याची धमक नाही. महाराष्ट्र कालपर्यंत पाणी दाखवत होता, आज महाराष्ट्राचे पाणी जोखले जात आहे. मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल! त्यातच सगळय़ांचे हित आहे. असा हल्लाबोल
“राज्यात कमजोर, अशक्त, बेकायदेशीर ‘खोके’ सरकार आल्यापासून इतर राज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले सुरू केले. बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प असून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत,” तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणे कधीकाळी सीमा भागात जाऊन आंदोलन केले असे सांगतात, पण गेल्या अनेक वर्षांपासून या महाशयांकडे सीमा भागाचा कार्यभार होता. ते किती वेळा बेळगावला गेले? गेल्या चारेक महिन्यांपासून ते मुख्यमंत्री आहेत. काय केले त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी? मुख्यमंत्र्यांचे रोज चार तास तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीत जात आहेत, पण सीमा बांधवांचे भविष्य आणि भवितव्य तसेच अंधकारमय आहे. त्यांचे कानडी टाचांखाली चिरडणे व भरडणे संपलेले नाही. तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीतून वेळ मिळाला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा कठोर समाचार घेतला पाहिजे,” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या ७०-७५ वर्षांपासून भिजत घोंगड्याप्रमाणे पडला आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून महाजन कमिशनच्या अन्यायाविरोधात मराठी सीमा बांधवांनी असंख्य लढे दिले, बलिदाने दिली; पण सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय मिळत नाही. उलट त्यांच्यावर जुलूम-अत्याचार वाढतच आहेत. सीमा भागाचे संपूर्ण कानडीकरण करून मराठी भाषा, संस्कृतीचे अस्तित्व नष्ट करण्याचे अघोरी प्रकार सुरू आहेत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे व ‘तारीख पे तारीख’च्या पेचात फसले आहे. त्यात आता कर्नाटकमधील भाजपाचे मुख्यमंत्री बोम्मई महाशयांनी महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट वगैरे गावे कर्नाटकात खेचण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्र अस्मितेचा हा असा घोर अपमान होऊनही ‘खोके’ गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाही. असे सामनातून म्हटले आहे.