आज उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपुष्टात येत आहे. यामुळे 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का? हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक आयोगात गेला आहे. मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार 23 जानेवारी 2018 रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या.
या निवडणुकीत उद्धव यांच्याकडे 5 वर्षे पक्षप्रमुखपद देण्यात आले होते. ही मुदत 23 जानेवारी 2023 रोजी पूर्ण होत आहे. एकीकडे मुदत पुर्ण होत असताना शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे. या वादावर 30 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आजपासून 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत सोमवारी संपणार आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी निवड झाली. ही मुदत आज सोमवारी संपत आहे.