मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केलेली असतानाच आज महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क नाही असं विशेष PMLA कोर्टाने सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीचं राज्यसभेच्या समीकरण विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच महाविकास आघाडीचे नेते आता अपक्षांसह अन्य काही पक्षांची मदत आपल्याला घेता येईल का याची चाचपणी करताना दिसत आहेत.
खासदार इम्तियाज जलील यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली. वरळीमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला जलील यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करु आणि निर्णय घेऊ. आतापर्यंत झालेल्या चर्चेवर आम्ही समाधानी नाहीत. काही मुद्यांवर आम्हाला स्पष्टता हवी असून, त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ" असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. तर "या निवडणुकीत एक-एक मत महत्वाचं असून, त्यासाठी प्रयत्न करणार. त्यांचे दोन आमदार आहेत, ते भाजपच्या विरोधात असल्यानं आम्हाला मतदान करु इच्छितात" असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
जलील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, जोपर्यंत आम्हाला ते जाहीरपणे मतं मागणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही. विकासनिधीमध्ये आमच्याबद्दल भेदभाव केला जातो असं आमच्या आमदारांचं म्हणणं आहे. त्याबद्दल आम्हाला आश्वासन देण्यात आलं आहे. तसंच दोन-तीन इतर मुद्दे सुद्धा आम्ही उपस्थित केले. राज्यात वक्फ बोर्डाच्या जागेवर जे कार्यालयं आहेत, त्यांनी भाडं द्यावं. तसंच राज्यसेवा आयोगामध्ये अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या जागा भरत नाहीत असे अनेक मुद्दे मांडले असं जलील यांनी सांगितलं. तसंच उद्या सकाळी 9 वाजता हैद्राबादमधून असदुद्दीन ओवैसी याबद्दलचे ट्विट करुन निर्णय जाहीर करतील असं जलील यांनी स्पष्ट करतील.