लोकसभा निवडणुकीचे पडघम येत्या काही दिवसांत वाजणार असून सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, या मतदारसंघातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे शिंदे गटाने हेमंत पाटील यांचा पत्ता कट केला आहे. या जागेसाठी बाबूराव कदम कोहळीकर हे हिंगोलीचे शिंदे गट (शिवसेना) नवे उमेदवार असणार आहेत. शिंदे गटाने अचानक उमेदवार बदलल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बांगर म्हणाले, हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमध्ये उमेदवारी देण्यात आलीय. हिंगोली लोकसभेची उमेदवारी बाबूराव कदम यांना देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवाराचा पत्ता कट झाला, असं नाही. याआधी हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती, पण आता उमेदवारी रद्द करण्यात आली आहे, यामागे काय कारण आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना बांगर म्हणाले, राजश्री पाटील यांना तिकडे उमेदवारी दिली आहे.
बाबूराव कदम या मतदारसंघातील जिल्हाप्रमुख आहेत. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो. उमेदवार बदलण्याची शिवसेनेवर वेळ आली नाही. या ठिकाणचं समीकरण पाहून उमेदवार दिला आहे. यवतमाळमध्ये भावना गवळींचा पत्ता कट होतोय? यावर बोलताना बांगर म्हणाले, भावना गवळी यांना कुठेतरी संधी देतील. उमेदवार बदलला नाही, हेमंत पाटील यांच्याजागी राजश्री पाटील यांना यवतमाळ येथे उमेदवारी दिली आहे.