आजच्या सामनाचा अग्रलेखातून भाजपा शिंदे गट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकांना आजही अपेक्षा आहेत, पण संभ्रम असा की, कोणते मोदी खरे? लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचार संपूर्ण मिटविण्याची गर्जना करणारे मोदी खरे, की कालपर्यंत ज्यांच्यावर ‘ईडी’ कारवाईचे भय होते व त्या भयाने भूमिगत झालेल्या खासदार भावनाताईंचे रक्षाबंधन करून घेणारे मोदी खरे ? भाजपने तरी यावर प्रकाशझोत टाकावा” असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.
आता भावनाताई एकदम मस्त आहेत. किरीट सोमय्यांनी भावनाताई श्री. मोदींना राखी बांधत आहेत या फोटोचे लॉकेट करून आपल्या गळ्यात बांधले आहे. यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, राहुल शेवाळे यांच्या फोटोंची लॉकेटस् त्यांनी सोनाराकडे बनवायला दिली आहेत. प्रश्न इतकाच आहे की, नक्की कोणते मोदी खरे? भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे देशाला लाल किल्ल्यावरून वचन देणारे मोदी खरे, की भावनाताईकडून आदरपूर्वक राखी बांधून ‘संरक्षणा’ची हमी देणारे मोदी खरे ? असा सवाल सामनातून आता विचारण्यात आला आहे.
यासोबतच महाराष्ट्रातील खोकेबाज आमदारांचे भवितव्य न्यायालयाच्या हातात आहे. खरे तर महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकार व दलबदलू आमदारांवर तत्काळ निकाल अपेक्षित होता व निकाल लागताच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी दलबदलूंच्या राजकीय भ्रष्टाचारावर प्रहार करायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. भारतीय राजकारण व समाजजीवनात स्वच्छ राजकारणी म्हणून, एक श्रेष्ठ पुरुष म्हणून मोदींची प्रतिमा इतिहासात टिकावी असे वाटते, पण राजकीय विरोधकांवर पेंद्रीय तपास यंत्रणेचा झाडू आणि भावनाताई, यशवंत दादांच्या तोंडी शुद्ध तुपातला लाडू असा एपंदरीत करेक्ट कार्यक्रम सुरू आहे. बिहारचे सरकार घेरण्याची रणनीतीदेखील स्पष्ट दिसतेय.
बिहारात नितीश कुमारांनी भाजपास दूर करून राष्ट्रीय जनता दलाबरोबर सरकार स्थापन केले. त्याबरोबर भाजपमधील सत्य व प्रामाणिकपणाचा अंश जागा झाला व नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात कसे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत यावर ते प्रकाशझोत सोडू लागले. भारतीय जनता पक्षाचे 152 खासदार या ना त्या गुन्हय़ांमुळे ‘डागी’ आहेत हे ते विसरले. बिहारच्या कायदामंत्र्यावर ‘वॉरंट’ आहे म्हणून धोपटाधोपटी सुरू आहे. या कायदामंत्र्यांनी पलटी मारून भाजपच्या मनगटास राखी बांधली तर त्या ‘वॉरंट’च्या कागदाचे गुलाबी प्रेमपत्रात रूपांतर होईल. अनेक गौडबंगाले व रक्षाबंधने नजीकच्या काळात होत राहतील, पण सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न कायम राहील. कोणते मोदी खरे ? लाल किल्ल्यावर तिरंगा फेटा घालून भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे, की ‘या भावनाताई’ अशा बंधुप्रेमाची साद घालणारे? पंतप्रधान मोदी यांची कोणीतरी फसवणूक करतेय.