राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. अजित पवार म्हणाले होते की, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा. असे म्हटले होते.
याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा अग्रलेख सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” असे विधान अजित पवार यांनी करताच भाजपपुरस्कृत धुळवड संघटनांनी गदारोळ सुरू केला.छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच दि. 6 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळ भट अग्निहोत्री महाबळेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. संभाजीराजे म्हणतात, ”राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हांस अगत्य.” याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे. यासोबतच संभाजीराजांना स्वराज्य व धर्मरक्षणासाठी शेवटी हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी यातना सहन केल्या, मरण पत्करले; पण मोगलांशी तडजोड केली नाही. त्यामुळे स्वराज्य व धर्मरक्षणासाठी संभाजीराजांनी केलेला त्याग व शौर्याचे वर्णन करावयास शब्द नाहीत. हा शौर्याचा व धर्मरक्षणाचा वारसा संभाजीराजांनी आपल्या राजश्री आबासाहेबांकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.