छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच आता शिवसेनेचा अग्रलेख सामनातून भाजपावर चांगलाच निशाणा साधण्यात आला आहे.
सामनातून म्हटले आहे की, छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत व ज्यांनी उसळून तलवार काढली आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले आहेत. आता महसूलमंत्री विखे पाटील यांनी राज्यपालांचा बचाव केला आहे. कोश्यारींविरोधात लोकभावना भडकविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे विखे पाटलांनी सांगितले. विखेंनी असे बोलणे हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचाही अपमान आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल! एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयनराजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?’ हा निर्लजपणाच आहे! अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांची तुलना शंभर तोंडांच्या रावणाशी करताच मोदी व त्यांच्या लोकांनी लगेच काँग्रेस व खरगेंवर प्रतिहल्ले सुरू केले. मोदींना रावणाची उपमा देणे हा गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे जाहीर सभांतून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येत आहे. गुजराती जनतेने मोदींच्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असे मोदी सांगू लागले. पंतप्रधानांचा अपमान करणे हे चूकच आहे. मात्र जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही असे भाजपचे म्हणणे आहे? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.