एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पावसामुळे राज्यातील परिस्थिती पाहता शिवसेनेने शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. बंडखोर गटातील आमदारांनी हिंदुत्वासाठी शिवसेना सोडल्याने त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा नसेल तर भाजपाच्या मंत्र्यांनी शपथ घेऊन राज्याचा कारभार हाती घ्यावा असा शिवसेनेने त्यांना सल्ला दिला आहे.
अतिवृष्टी आणि महापूर यामुळे राज्याच्या अनेक भागांत पिण्याचा दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही साथीच्या रोगांचा फैलाव होण्याचा धोका आहे. परिस्थिती दिवसेंदिवस भयंकर होत आहे आणि सरकार म्हणून असलेली दोन डोकी फक्त शाब्दिक आश्वासनांचीच पतंगबाजी करीत आहेत, “मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, पण पंधरा दिवस उलटून गेले तरी मंत्रिमंडळाचा पत्ता नाही. महाराष्ट्राची ही अशी निर्नायकी अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी महापूर आणि प्रलयाचा हाहाकार माजला आहे. सहा जिल्ह्यांना पुन्हा रेड अलर्ट आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत अतिवृष्टी आणि महापुराने ९० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. त्यात आता अतिवृष्टीनंतरच्या साथीच्या आजारांनीही डोके वर काढायला सुरुवात केली आहे. अमरावती जिल्ह्यात कॉलराच्या साथीने थैमान घातले आहे. या आजाराने आतापर्यंत तेथील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. असे शिवसेनेने म्हटले आहे.
यासोबतच “महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना भाजप पिलावळीस प्रश्न पडत असे ‘राज्यात सरकार आहे काय? सरकारचे अस्तित्व दिसत नाही’ वगैरे वगैरे. आता महाराष्ट्रातील तमाम जनतेला नेमका तोच प्रश्न पडला आहे. राज्यात सरकार आहे काय? असलेच तर ते सरकार कोठे आहे? शिवसेनेतील फुटीर गटाबरोबर भाजपाने पाट लावून दिल्लीच्या साक्षीने सात फेरे घेतले. पण वाजंत्री बहु गलबला होऊनही वऱ्हाडाच्या मुखी गोडधोडाचा घास काही जात नाही,” असा जबरदस्त टोला देखिल शिवसेनेने शिंदे सरकारला लगावला आहे
“मुख्यमंत्री बंद लॅपटॉपवर परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत असल्याची मजेशीर छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. मुख्यमंत्री एखाद्या अधिकाऱयास फोन करतात, सूचना देतात त्याचे ‘लाइव्ह’ व्हिडीओ चित्रण सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची एक तऱहा तर उपमुख्यमंत्र्यांची दुसरीच तऱहा असा एकंदरीत प्रकार राज्यात सुरू आहे. तरी सरकार कोठे आहे? मंत्रिमंडळ कोठे आहे? राज्यपाल महोदय समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत काय? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेसमोर आहेत,” असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.