एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडीवरून सुनावणी दरम्यान वाद रंगलेला असताना शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून ई-मेल संदर्भात करण्यात आलेल्या आरोपावर उत्तर दाखल करण्यात आलं आहे. ठाकरे गटाने बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश ज्या मेल आयडीवर दिले होते, तो मेल आयडी एकनाथ शिंदे यांचा नाहीच असा दावा शिंदेंच्या वकिलाने केला होता. मात्र आता ठाकरे गटाच्या वकिलांनी थेट पुरावाच सादर केला.
एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 रोजी ठाकरे गटाकडून पाठवण्यात आलेल्या पत्राच्या ईमेल आयडी शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि ईमेल आयडी चुकीचा असल्याचं अध्यक्षांना दिलेल्या अर्जात सांगितल्यानंतर ठाकरे गटाकडून यासंदर्भात पुराव्यासह उत्तर सादर करण्यात आला आहे.
ठाकरे गटाकडून उत्तर दाखल करत असताना 20 जून 2022 रोजी च्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी पुस्तिका आपल्या उत्तरांमध्ये सादर केली आहे ज्यामध्ये राज्यातील सर्व आमदारांचे नाव पत्ता फोन नंबर आणि त्यासोबतच ईमेल आयडी आहे.
या पुस्तिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा eknath.shinde@gmail.com आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा ठाकरे गटाने नमूद केलेल्या आणि त्यासोबतच बैठकीसाठी पत्र ज्या ईमेल आयडी वर पाठवलं त्याच ईमेल आयडी चा संदर्भ या पुस्तिकेमध्ये असल्याचा ठाकरे गटांनी या उत्तरांमध्ये सांगितला आहे.
सुनावणी दरम्यान हा एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडीच अस्तित्वात नसल्याचा शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी दावा केला होता शिवाय 2023 च्या पुस्तिकेमधील आमदारांच्या माहिती चा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांचा ईमेल आयडी हा ministereknathshinde@ gmail.com असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे.