अमरावती प्रतिनिधी | सुरज दाहाट : आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानावर जाऊन 23 एप्रिल रोजी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणू असा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष या वादात आता अपक्ष राणा दाम्पत्यांनी देखील उडी घेतली आहे. खासदार नवणीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे आता वारंवार ठाकरे सरकारवर आरोप करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसैनिक (Shiv Sena) देखील त्यांच्या आरोपांना उत्तर देताना दिसत आहेत.
आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीच्या दिवशीही उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण करू असा इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार रवी राणा यांनी २३ एप्रिल रोजी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर अमरावतीमधील शिवसैनिकांनी त्यांना थेट आव्हान दिलं आहे. शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी रवी राणा यांना तुम्ही आधी अमरावती स्टेशनवर पाय ठेवून दाखवा असं आव्हान केलं आहे.
रवी राणा हे पोकळ धमक्या देत आहेत. रवी राणा यांच्यासाठी मातोश्री तर दूर, मात्र त्यांना अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा पाय ठेवू देणार नाही असं म्हटलं आहे. रेल्वे स्टेशनवर २२ एप्रिल रोजी शिवसैनिक देखील तयार राहतील असा इशारा शिवसेनेचे पराग गुडधे यांनी दिला आहे. त्यामुळे आता अमरावतीत रवी राणा विरुद्ध शिवसेना असा सामना पुन्हा रंगला आहे.