कल्याण|अमझद खान : उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाची शुभेच्छा देणाऱ्या बॅनर लावणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावला. या फोटोवरुन शाखेत ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. सध्या पोलिसांनी मध्यस्थी करुन परिस्थीती शांत केली आहे. आता पुढे काय होणार याकडे सगळ्य़ांचं लक्ष्य लागून आहे.
आज दुपारी डोंबिवलीतील शिवसेना शहर शाखेत शहर प्रमुख विवेक खामकर हे त्यांच्या कार्यकत्र्यासह शाखेत बसले असता. काही कार्यकर्ते शिवसेना शाखेत घुसले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटा लावला या शाखेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. एकनाथ शिंदे आणि खासदार शिंदे यांचाही फोटो होतो. मात्र उद्धव ठाकरे समर्थकांनी दोघांचा फोटो काढला होता. आज शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून पुन्हा एकनाथ शिंदे आणि खासदार शिंदे यांचा फोटो लावला. याबाबत रमेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिंदे साहेबांचा फोटो काढला होता. तो पुन्हा लावून देत नसतील तो लावण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेतला पाहिजे होता. तो पुढाकार मी घेतला आहे.
शहर प्रमुख विवेक खामकर यांनी सांगितलं की, 150 कार्यकर्ते शाखेत आले होते. त्यांनी सांगितलं शाखा खाली करा. आम्ही बोललो की शाखा खाली करणार नाही. तुम्हाला जे कारायचंय ते करा. यामुळे फोटो लावण्यावरून जोरदार राडा झाला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बॅनर लावले होते.