छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत.
ढोल ताशाच्या गजरात शिवभक्तांनी राजांना मानाचा मुजरा केला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांनी गर्दी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची राजेशाही मिरवणूक निघणार आहे. आज सकाळी 7 ते 12 या वेळेत किल्ले रायगडावर राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा संपन्न होत आहे. हा सोहळा 6 जूनपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि राज्य शासनाच्या वतीनं आयोजित या सोहळ्याला गुरुवारी शिर्काईमातेच्या पूजनानं सुरुवात झाली.
प्रशासनाकडून राज्याभिषेकाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने किल्ले रायगड आणि राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.