सातारा शहरातील रिक्षा चालकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतली. रिक्षा चालकांच्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून रिक्षा व्यवसाय अडचणीत येत चालला आहे. रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका करत उदयनराजेंनी पालिका निवडणुकीतून रिटायरमेंट घ्यावी असा सल्ला दिला आहे.
सातारा पालिकेत त्यांची सत्ता असताना त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे होती. नुसतं प्रशासकाकडे बोट दाखवून अलिप्त झाले हे चालणार नाही. तुम्ही जबाबदारी स्वीकारणार नसाल तर सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी असा सल्ला उदयनराजेंच्या सत्तारूढ आघाडीला देत सातारा नगर पालिकेची निवडणूक आल्यानंतर सातारा विकास आघाडीच्या नेत्यांची मिठया मारण्याची आणि पप्या घेण्याची नौटंकी सुरू होईल असं सांगत खासदार उदयनराजेंवर सडकून टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी राजे यांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या मधील वाद अनेक दिवसांपासून सुरु आहे. तर आता दोघांनीही भाजप पक्षात प्रवेश केला असून हा वाद अद्यापही संपलेला नाही.