मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर सर्वाधिक चर्चेत आलेले वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांना या पदावरुन हटवल्यानंतर मोरे यांनी आपल्या पक्षात येण्याच्या इतर पक्षांनी ऑफर दिल्या होत्या. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नाराज वसंत मोरे (Vasant More) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेत येण्याबाबत फेरविचार करावा अशी ऑफर दिली आहे.
दरम्यान युवा शिवसेना नेते वरुन देसाई यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधत शिवसेनेत येण्याची ऑफर दिला आहे. शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडून त्यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
'वसंत मोरे राष्ट्रवादीत आले तर त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.' असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Pune) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते. मात्र, खुद्द वसंत मोरे यांनी आपण मनसे सोडणार नसल्याचंही जाहीर केलं आहे. तसंच माझी या पदावरुन हकालपट्टी केली नसून माझ्या या पदाचा कार्यकाळ संपल्याने ही जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवली असल्याचं मोरेंनी सांगितंल आहे.
मात्र, आता येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मोरे नाराज असून ते आपल्या पक्षात येतील का? यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. अशातच आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच वसंत मोरेंना शिवसेनेमध्ये येण्याबाबत पुनर्विचार करावा असा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.