शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. सकाळीच ईडीची टीम राऊत यांच्या घरी दाखल झाली. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
ईडीच्या (ED) या कारवाईचा विरोध आणि निषेध करण्यासाठी शिवसैनिक राऊतांच्या घराच्या बाहेर जमण्यास सुरूवात झालीयं. इतकेच नव्हेतर शिवसैनिकांनी त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यासही सुरूवात केलीयं. राऊतांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरवात झाली आहे. आणि जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. ही कारवाई अत्यंत चुकीची आहे. विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी अशाप्रकारची कारवाई केली जात आहे.असे शिवसैनिक म्हणाले.
कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी 20 जूलै रोजी बोलावले होते. संसदेच्या अधिवेशनाचं कारण देत त्यांनी पुढची तारिख मागितली होती. मात्र त्यांनी मागितलेली पुढची तारीख फेटाळण्यात आली होती. त्यानंतर 27 जुलै रोजी त्यांना नवीन समन्स पाठवण्यात आला होता. त्यामुळे संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे.