अमजद खान, कल्याण : दसरा मेळाव्या पाठोपाठ कल्याणच्या किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव कोण साजरा करणार यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरु झाला आहे. दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्याकडे उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली आहे. आत्ता जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.
1968 साली किल्ले दुर्गाडीवर पूजा-अर्चाना करण्यासाठी बंदी हूकूम जारी करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपत्नीक बंदी हूकूम मोडून देवीची पूजा बांधली होती. तेव्हापासून आजर्पयत दरवर्षी किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शिवसेनेच्या नियमाप्रमाणे किल्ले दुर्गाडी देवीच्या नवरात्र उत्सवाचा अध्यक्ष हा शहर प्रमुख असतो. मात्र यंदा राजकीय स्थिती वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आहेत. सगळीकडे या दोन्ही गटाकडून दावा सांगितला जात आहे. दसरा मेळाव्यावर या दोन्ही गटात जुंपलेली असताना आता कल्याणमधील किल्ले दुर्गाडी देवीचा उत्सव साजरा करण्यासाठी विविध परवानग्या शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकारी यांच्याकडे पवानगी मागितली आहे. बासरे यांनी सांगितले की, पोलिस प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले की, त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला गेला आहे. त्यांच्याकडून परवानगी येणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शहर प्रमुख परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. परवानगी मिळताच उत्सव साजरा केला जाणार आहे.
दरम्यान शिंदे गटाला समर्थन देणारे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी पोलिस प्रशासनाकडे मागितली आहे. त्यांच्याकडूनही उत्सव साजरा करण्यावर दावा करण्यात आलेला आहे.
नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या परवानगीवरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आलेले आहेत. आत्ता जिल्हाधिकाऱ्यांनकडून नवरात्र उत्सवाची परवानगी कोणाला मिळणार याकडे सगळ्य़ाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिंदे गटाला समर्थन देणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी नवरात्र उत्सवानिमित्त किल्ले दुर्गाडी परिसरात स्वच्छचा करण्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप केला आहे.