एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सेना भाजपमधील संघर्ष वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. अशातच आता भाजपने शिवसेनेचे पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य न करण्याचं आश्वासन दिलं होतं, असा दावा बंडखोर सेनेच्या गटाच्या प्रवक्त्याने शनिवारी केला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना ही गोष्ट माहिती नव्हती असं दिपक केसरकर यांनी सांगितलं आहे. दीपक केसरकर आणि इतर काही बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर किरीट सोमय्यांनी केलेल्या टिकेनंतर नाराजी व्यक्त केली होती.
दिपक केसरकर म्हणाले की, "आम्ही गुवाहाटीहून परत आलो आणि भाजप नेत्यांसोबत आमची बैठक झाली. तेव्हा आम्ही स्पष्ट केलं की, आम्ही उद्धव ठाकरे यांना दुखावून आलो असलो तरी, त्यांच्यावर कोणतीही टीका केलेलं सहन करणार नाही." देवेंद्र फडणवीस यांनी याला सहमती दर्शवली. मात्र किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांच्यावर हल्ले करणं सुरूच ठेवलं, तेव्हा फणवीसांनी सोमय्यांना या गोष्टीबद्दल माहिती दिली आहे असं असे दीपक केसरकर म्हणाले असं वृत्त एनडीटीव्हीने प्रसारित केलं आहे.
"सोमय्या यांनी आज मला फोन केला आणि सांगितलं की, शिंदे गट आणि फडणवीस यांच्यात झालेल्या या चर्चेबद्दल त्यांना माहिती नव्हती." असं केसरकर म्हणाले आहेत. आमच्याप्रमाणे फडणवीसही उद्धवजींचा आदर करतात, असंही केसरकर म्हणाले. दरम्यान, शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी आरोप केला होता की, भाजपकडून जेव्हा त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप केले जात होते, तेव्हा बंडखोर सेनेच्या आमदारांनी मौन बाळगलं होतं.