Sheikh Hasina Resigns As Prime Minister In Bangladesh: बांगलादेशात माजी सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकरीच्या आरक्षणातील कोट्याविरोधात आंदोलनाचा भडका उडाला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात परिस्थिती अस्थिर झाल्यानं शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्या भारतात दाखल झाल्या, अशी माहिती समोर येत आहे.
बांगलादेशमध्ये अराजकता सुरु झाल्यानं शेख हसीना यांनी त्याचे ढाका येथील निवासस्थान सोडलं. त्यानंतर लष्कराने बांगलादेशचा ताबा घेतला आहे. बांगलादेशची परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याची परिस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना थोड्याच वेळात त्रिपुरामध्ये दाखल होणार आहेत. आगरताला विमानतळावर त्यांचं हेलिकॉप्टर लँड होणार आहे. बांगलादेशमध्ये लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार आहे. तसच बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी ताबा घेतला आहे.
बांगलादेश पंतप्रधान कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एएनआयला माहिती दिलीय. बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन सुरु असल्यानं पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका येथील अधिकृत निवासस्थान सोडलं आहे. त्यांची सध्याच्या ठिकाणाबाबत अद्याप काही सांगता येत नाही. ढाकामध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. ढाका येथील पंतप्रधान कार्यालयाला लोकांनी घेराव घातला आहे.