अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. सभा आटपून परत येताना देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना काटोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला. तसेच अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला चांगला प्रतिसाद मिळतोय हे काही प्रवृत्तींना सहन होत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहीनीशी ते बोलत होते.
शरद पवार काय म्हणाले?
“अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. काटोलमध्ये ज्या पद्धतीचा लोकांचा अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला प्रतिसाद मिळत आहे. हे काही प्रवृत्तीना सहन होत नाही. आज अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या डोक्याला लागलं आहे. त्यांच्या डोक्यामधून रक्त येत असल्याचं दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप ठीक आहे. मात्र, अशा प्रकारचा हल्ला करणं हे अयोग्य आहे. याचा मी निषेध करतो.
काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखरेच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदारसंघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत ते कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले.