राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पहिल्यांदाच जाहीर सभा झाली. पवारांनी छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात कार्यकर्त्यांसह नाशिकच्या जनतेला संबोधित केलं.
शरद पवार यांनी येवल्याच्या नागरिकांची माफी मागितली
“आज मी या ठिकाणी टीका करायला नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे. मी माफी यासाठी मागतोय कारण माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही. पण इथे माझा अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला”, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज
शरद पवार म्हणाले, माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेलाय असं तुम्हाला वाटेल किंवा तुमचा तसा निष्कर्ष निघेल त्याला हवी ती शिक्षा द्या. त्यासाठी तुम्हाला आमचा पाठिंबा असेल.
अजित पवारांना फटकारलं
वय झाल्यानं निवृत्त होण्याचा सल्ला देणा-यांनाही त्यांनी चांगलंच फटकारलं. बाकी काहीही टीका करा चालेल मात्र वैयक्तिक आणि वयाची टीका खपवून घेणार नाही. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मी वयाच्या 92 वर्षापर्यंत लढणार असल्याचे यापूर्वीही शरद पवार यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जून रोजी भोपाळ येथे भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती, तसेच भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा, त्यांचे इतर घोटाळे बाहेर काढायला हवेत.