प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.
रतन टाटा आणि शांतनू नायडू या दोघांची मैत्री सर्वांनाच माहित होती. अनेकदा रतन टाटा आणि शांतनू दोघे एकत्र वेळ घालवताना आपल्याला पाहायला मिळायचे. यासोबतच शांतनू नायडू याच्यासोबत रतन टाटा यांनी त्यांचा 84वा वाढदिवस साजरा केला होता.
शांतनूच्या मोटोपज या संस्थेने रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांसाठी डेनिम रिफ्लेक्टर कॉलर बनवली. रात्रीच्या वेळी वाहनांच्या धडकेपासून कुत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी ही डेनिम रिफ्लेक्टर कॉलर बनवली. याच डेनिम रिफ्लेक्टर कॉलरमुळे शांतनू आणि रतन टाटा यांची भेट होऊन मैत्री झाली.
याच पार्श्वभूमीवर रतन टाटा यांचा लाडका मित्र शांतनू नायडू याने खास पोस्ट केली आहे. शांतनू नायडू पोस्ट करत म्हणाला की, त्यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याच्या प्रयत्नात मी आयुष्य घालवणार आहे. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. गुडबाय, माय डियर लाईटहाऊस. असे शांतनू नायडू म्हणाला.