Shambhuraj Desai On Sanjay Raut : एनडीए सत्तेत येणार नाही किंवा एनडीए बहुमताच्या जवळ जाणार नाही? असा एक तरी सर्वे दाखवत आहे का ? जवळपास सगळ्या एक्झिट पोलमधील सारांश पाहिला तर बहुमत हे नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जात असल्याचे दिसत आहे. चार तारखेच्या निकालात ४०० पारच्या जवळपास एनडीएचा आकडा पोहोचलेला दिसेल. संजय राऊत यांनी स्वतःचे एक्झिट पोल सांगावेत, त्यांचा नऊच्या नऊ एक्झिट पोलवर विश्वास नसेल, तर त्यांनी स्वतःचा एक्झिट पोल जाहीर करावा, अस थेट आव्हान मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना केलं आहे.
शंभूराज देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले, संजय राऊत यांचं एक विधान सत्य झालं आहे. ते जे बोलतात असं कधीच घडत नाही. संजय राऊत यांना मोठे वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष केंद्रीत करून घ्यायचं असतं. स्वतः विश्व ज्ञानी आहे, हे संपूर्ण देशाला आणि राज्याला सांगायचं, अशी सवय त्यांना आहे. आज पण सामान्य माणूस सुद्धा त्यांच्याकडे गांभीर्याने बघत नाही. महाविकास आघाडीचा अंदाज जरी ३५ जागांचा असला, तरी आमच्या अंदाजानुसार आम्ही ४५ जागांच्या आसपास पोहचू.
अजित पवार यांचा घटक पक्ष हा आमच्या युतीचा एक भाग आहे. त्यामुळे जिथे जिथे अजित पवार यांचे उमेदवार उभे होते, तिथे आम्ही हातात हात घालून काम केलेलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील. सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले, हे एक लाख मताधिक्याने निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.
एक्झीट पोल हा वेगवेगळ्या वाहिन्यांनी संस्थांमार्फत केलेला आहे. आतापर्यंत साधारण आठ ते नऊ सर्वे आले आहेत. त्या सर्व सर्व्हेमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळाल्याचं समोर आलं आहे. एक्झिट पोलचे हे प्राथमिक अंदाज आहेत. मी नऊ लोकसभा मतदारसंघांमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी मतदार आम्हाला विचारात होते, जो खासदार मोदी साहेबांना पंतप्रधान करणार आहे, त्यांना आम्ही मत देणार आहे.
महाराष्ट्रात आम्ही ४५ जागांचे धेय्य आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आहे. त्याच्या जवळपास आम्ही पोहोचलो आहोत. एक्सेस इंडिया सर्वे चुकला आहे असं म्हणता येणार नाही. आम्ही शिवसेना म्हणून ज्या १५ जागा लढलो आहोत, त्या जागेवर इतर पक्षांचा जो स्ट्राईकरेट आहे, त्यांच्यापेक्षा चांगला स्ट्राईकरेट आमचा दिसेल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून आणू, असंही शंभूराज देसाई म्हणाले.