कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. जिकडे तिकडे मोठ मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य वाहतूक कोंडीचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलनाक्यावर स्वतंत्र मार्गिका करण्याबाबत सांगितलं. दरम्यान, याआधीच गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीही देण्यात आली आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोलनाक्यावर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना एक विशेष स्वतंत्र मार्गिका ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे टोलनाक्यांवर वाहतुकीची होणारी कोंडी टळेल. तसंच गणेशोत्सवासाठी निघालेल्या गणेशभक्तांचाही प्रवास वेगाने होईल, असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी खालापूर टोलनाक्याला भेट दिली. यानंतर त्यांनी खालापूर टोल नाका परिसरात असलेल्या अधिकाऱ्यांसोबत आणि पोलिसांसोबत चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी याठिकाणी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना केल्यात. तसंच मनुष्यबळ वाढवणं, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणं, अपघात झाल्यास तातडीने उपाययोजना करत मदत पुरवणं, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिली.