विधानसभेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत ते राज्यात स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी लोक उपस्थित होते.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी हिंदी, मराठी तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तसेच ते गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. सयाजी शिंदे यांनी लाखो झाडे लावत सह्याद्री देवराई उभे केलेलं आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची राज्यभरात चर्चाही झाली. मात्र, सामाजिक कार्यानंतर आता सयाजी शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत अजित पवारांच्या उपस्थितीत घड्याळ हाती बांधलं आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे म्हणाले आहेत की, ''अजून मी नेता- पुढारी झालो नाही. त्यामुळे मला प्रोटोकॅाल माहिती नाही. मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या आहेत. पण राजकारणात येईल, असा कधी विचार केला नव्हता. मंत्रालयात मी २५ वेळा गेलो, तर १५ वेळा दादांनाच भेटलो.''
ते पुढे म्हणाले, ''दादांनी भेटणं म्हणजे पहाटे ६ आणि ७ वाजता भेटणं. मागच्या ८ दिवसांत हा निर्णय झाला. काही विषय सिस्टिममध्ये राहून लवकर मार्गी लावता येतील. सिस्टिममधून काम झालं तर मोठ्या संख्येने झाडे लागतील. या पक्षाच नियोजन आणि काम मला आवडतं. शेतकऱ्यांच्या योजनांसंदर्भात पक्ष चांगला निर्णय घेतो, असं मला वाटतं.''