दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते ईडीच्या रडारवर होते. त्यांच्या मालकीच्या वेगवेगळ्या मालमत्तांची चौकशी देखील ईडीने यापूर्वी केलेली होती. त्यामुळे आता दिल्लीच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
सत्येंद्र जैन हे केजरीवाल सरकारचा मुख्य चेहरा आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई करत, ईडीने त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता काही दिवसांपूर्वी जप्त केली होती. ईडीने त्याच्याशी संबंधित ही मालमत्ता अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास इन्फोसोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड दिली आहे. मंगलायतन प्रकल्प, जेजे आयडियल इस्टेट आणि जैन यांच्या कुटुंबातील स्वाती जैन, सुशीला जैन आणि इंदू जैन यांच्याशी संलग्न.
... म्हणून ईडीने कारवाई केली; मनिष सिसोदियांचा आरोप
सत्येंद्र जैन यांच्याविरोधात 8 वर्षांपासून खोटी केस चालवली जातेय. त्यांना आतापर्यंत अनेकदा ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे. मध्ये काही वर्ष ईडीने त्यांना बोलवणं बंद केलं होतं, कारण त्यांना काही मिळालं नव्हतं. आता पुन्हा त्यांना बोलवलं जातयं, कारण ते हिमाचल प्रदेशचे निवडणूक प्रभारी आहेत.
जैन यांच्या अटकेनंतर कुमार विश्वास यांचा 'आप'वर निशाणा
कधीकाळी आम आदमी पक्षात असलेले नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी ट्विटरवरुन आम आदमीवर निशाणा साधला आहे. जेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा समोर आलं, तेव्हा मी सत्येंद्र जैन यांना जाब विचारला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीला माझ्यासमोर रडायला बसवलं होतं. तेव्हा मी म्हटलं होतं की, पर्सनल रिलेशन, तुमच्या जागेवर ठेवा आणि उत्तर द्या.