नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्याने काँग्रेसचीच कोंडी झाली. येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे यांनी अर्ज सादर केला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष चांगलाच नाराज झाला असल्याचे समजते.
याच पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून त्यांनी पक्षाचं नाव आणि लोगो दोन्ही काढून टाकल्याचं दिसून येतंय. याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. त्यांनी सोशल मिडियावरील आपले प्रोफाइल बदलले असून ट्विटर डीपी आणि बायोमधून काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकलाय.सत्यजित तांबे यांच्या फेसबुक आणि ट्विटरच्या कव्हर पेजवर एक संदेश झळकत आहे.
त्यांनी त्या संदेशमध्ये लिहिले आहे की, ‘वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं’ त्यामुळे सत्यजितने काँग्रेसला राम राम केला का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.