शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. सकाळीच ईडीची टीम राऊत यांच्या घरी दाखल झाली. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, तरीही शिवसेना सोडणार नाही' अशा आशयाचे ट्विट राऊतांनी केलं आहे. यासोबतच दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र