Sanjay Raut Press Conference : काल हे सर्व होत असताना जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर भयानक दहशतवादी हल्ला झाला आणि १० जणांचा बळी गेला. या घटनेवर नरेंद्र मोदी, अमित शहांनी काही संवेदना व्यक्त केलेल्या दिसत नाही. निवडणूक काळात अमित शहा वारंवार सांगत होते, आम्ही जम्मू काश्मीरवर नियंत्रण मिळवलं. तिथे शांतता प्रस्थापीत केली. पण काल अतिरेक्यांनी दाखवून दिलं की आम्ही अजून आहोत. हे दुर्देव आहे. सरकार नाकाम आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, तुम्हाला मणीपूरची, जम्मू-काश्मीरची चिंता नाही. बेरोजगारी, महागाईबाबत तुमच्याकडे कोणतीही योजना नाही. फक्त सरकार बनवायचं आहे. शेअर मार्केट चालवायचं आहे. व्यापारी उद्योगपतींना मदत करायची आहे. हाच तुमचा अजेंडा आहे. जनतेचे पैसै आहेत, लुटायचे आहेत तर लुटा. हेच सुरु आहे. बाकी काही नाही. काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचं सरकार नाही. आता पुन्हा मोदींचं सरकार, मोदी गॅरंटी, मोदी है तो मुमकीन है, असं सुरु राहणार. त्यांनी ओढून ताणून एक कॅबिनेट बनवलं आहे. नितिश कुमार, चंद्राबाबू हे दोन टेकू महत्त्वाचे आहेत.
या टेकूंचा इतिहास सर्वांना माहित आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पीयुष गोयल मंत्री झाले, ते स्टॉक एक्सचेंज वाल्यांचे मंत्री आहेत. शेअर बाजारातील लोकांचे मंत्री आहेत. अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे. नकली शिवसेनेच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकलं आहे. आयुष्यभर गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवत आहेत. अजित पवारांना काहीही मिळणार नाही. त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं.
जीतनराम मांझीसारखे एकच खासदार असलेल्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्रिपद दिलं जातं. नकली शिवसेनेचे ७ खासदार आहेत, असं म्हणतात. ह्यांना त्यांची औकात दाखवली आहे. प्रफुल्ल पटेलांची दाऊदच्या संबंधीत असलेली संपत्ती परत केली, असं त्यांनी सांगितलं आहे. अजून काय पाहिजे त्यांना. इडीने जप्त केलेली १५० कोटींची संपत्ती तुम्हाला परत दिली. तुमच्यावर असलेल्या केसेस रद्द केल्या. त्यांना पाठिंबा द्यावाच लागेल, नाहीतर तुरुंगात जातील. नाहीतर पुन्हा प्रफुल्ल पटेलची संपत्ती जप्त होईल, असंही संजय राऊत म्हणाले.