लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत धुसफूस सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय. परंतु, सांगलीतील स्थानिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेला विरोध आहे. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, यासाठी विश्वजित कदम दिल्लीवारीही करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांना प्रामाणिकपणे मदत करावी. शिवसेना वाघाची अवलाद आहे. राजकारण करून चंद्रहार पाटलांची कुणी कोंडी करत असेल, तर गप्प बसणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे. ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलं आहे. तुमची नौटंकी बंद करुन आम्हाला पाठिंबा द्या. नाहीतर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघात प्रामाणिकपणे मदत करा आणि मोठ्या संख्येने त्यांना निवडून द्या. जर कुणी भाजपची मदत केली, तर आम्ही गप्प बसणार नाही. मोदी समोर आले तर लोक जोडे मारतील. हा देश गुलाम करुन टाकला आहे.
आपण सर्व मोदी-अंबानी यांचे गुलाम झाले आहोत. उन्हामुळे वातावरण तापले आहे, तर हळूहळू राजकारणही तापेल. शिवसेना पुढे जाताना दिसेल, आपल्या विरोधकांचं डोकंही तापेल. ते आत्ताच तापलेले दिसत आहे. सांगलीमध्ये शिवसेना लोकसभा लढवत आहे. लोकांना याचं आश्चर्य वाटलं आहे. मक्तेदारी आपल्याकडे हवी, असं काँग्रेस नेत्यांना वाटतंय. पण या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, असंही राऊत म्हणाले.