Sanjay Raut Speech : ज्या प्रकारचं वातावरण या उत्तर महाराष्ट्रात आणि नगरमध्ये मला दिसतंय, ४० हजारापेक्षा जास्त मतं संदीप गुळवे यांना मिळतील. शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून ते विधीमंडळात जातील. विधीमंडळात पोहोचल्यावर ते शिवसेनेचे आमदार असणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी आम्ही त्यांच्यासाठी आग्रही असू. उद्धव ठाकरे साहेब आग्रही असतील. जेव्हा एक निवेदन तुम्ही त्यांच्याकडे देणार आहात, त्याची एक प्रत शिवसेना भवन आणि मातोश्रीवर जात असते. प्रश्न सुटले की नाही, हे पाहण्याची जबाबदारी त्यावेळी आमची असते. नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचा मुख्यमंत्री होणार आहे, म्हणून प्रश्न सुटणार आहेत. शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये, हे पहिलं काम करायचं आहे, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं.
संदीप गुळवे यांच्या प्रचारसभेत संजय राऊत पुढे म्हणाले, मतं का बाद होतात, याचा शोध मी यावेळी घेतला. हजाराच्या आसपास किंवा जास्त बोगस शिक्षकांचं मतदान इथे नोंदवलं गेलं आहे. मला आश्चर्य वाटलं आहे. आम्ही राजकारणातील लोक आहोत. आम्ही हेराफेरी करतो. पण शिक्षक मतदारसंघात शिक्षकांची मतं मिळावी, यासाठी बोगस शिक्षकांची मतं नोंदवली जातात.
मला असं वाटतं, हीच मतं बाद होतात. पण संदीप गुळवे यांच्या निमित्तानं ही प्रथा आणि परंपरा आपल्याला या निवडणुकीत मोडून काढायची आहे. आपण सर्वांनी एकजुटीनं संदीप गुळवे यांना मतदान करायचं आहे. आपल्याला कोणत्याही फेऱ्यांमध्ये अडकायचं नाही. पहिल्या फेरित संदीप गुळवेंना किमान ४० हजार मतं मिळवून द्यायची आहेत. पहिल्या फेरीतच हा आपला आमदार जिंकून आला पाहिजे.
ठाकरे साहेब मुंबईत आमचा अनुभव अत्यंत वाईट आहे. पदवीधर मतदारसंघात सर्वात जास्त मतं बाद होतात. ग्रामीण भाग, आदिवासी पाड्यांवर मतं कमी बाद होतात. पण शिक्षक पदवीधर मतदारसंघात मतं बाद होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याची कारणं शोधावी लागतील. लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशी परिस्थिती सध्या आहे. पण नाशिक मतदारसंघात पदवीधर मतदारसंघाची मतं बाद होणार नाहीत. याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.