राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, हा देश विज्ञानाच्या दिशेने नेण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते, तर या देशाला विज्ञाननिष्ठेच्या दिशेने नेण्याचे काम पंडित नेहरूंनी केले आहे. नाहीतर या हिंदुस्तानचा पाकिस्तान होण्यास वेळ लागला नसता. यासोबतच ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्याविषयी कोणी काही देशाला सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्य़ात प्रत्येकाचे स्थान आणि योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलून लोकांच्या ज्ञात काही वेगळी भर पडणार नाही.
तसेच स्वातंत्र्यसेनानी कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही एका विचारधारेचे नसतात. देश बनवण्यासाठी त्यांनी त्याग केला हे विसरून चालणार नाही. ते आता काय झालं, काय नाही हे स्पष्टीकरण देण्यासाठी जिवंत नाहीत असे राऊत म्हणाले आहेत.