ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, जर सांगलीमधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती आम्ही एक स्पष्ट केलेलं आहे सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीत कोणीही कटूतेने बोलायचे नाही. जरी सांगलीच्या बाबतीत काही लोकांनी भूमिका व्यक्त केली असतील काँग्रेसच्या. दिल्लीत गेले असतील, महाराष्ट्रात बोलत असतील. तरी आमच्या सूचना आमच्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना आहेत की आपण त्याच्यावर कोणतेही कटू मत व्यक्त करायचे नाही. या कार्यकर्त्यांच्या भावना असतात.
अशाच प्रकारच्या भावना आमच्या कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. त्याच्यावरचं मत आम्ही आमच्यात ठेवलं आम्ही त्यावर जाहीर प्रचार केला नाही. अशाच प्रकारच्या भावना रामटेकच्या बाबतीत व्यक्त केल्या, अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या तिन्ही सीटवर आम्ही अनेक वर्ष लढतो आहोत. या तिन्ही जागा आम्ही हसत हसत महाविकास आघाडीसाठी सोडल्या म्हणजे काँग्रेसला दिल्या. शेवटी आपण महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे फक्त आपल्याच पक्षाचा विस्तार करण्यासाठी आघाडी होत नाही. आघाडी ही आघाडीचा विस्तार करण्यासाठी होते. आणि देवाणघेवाण होत असते. सांगलीची जागा जर आम्ही एकत्र राहिलो तर शिवसेनेच्या मशालीवर आमचे चंद्रहार पाटील 100 टक्के जिंकत आहेत. पण काही व्यक्तीगत कारणामुळे, काही व्यक्तीगत अडचणीमुळे कोणाला भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करुन तिथे काही वेगळं घडवायचं असेल तर शिवसेना ते होऊ देणार नाही आणि ती जागा त्यामुळे शिवसेना लढते आहे.
आम्हाला खात्री आहे डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतो आहे. लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुद्धा प्रचारात उतरतील. जसे आम्ही इतरत्र उतरलेले आहोत. कोणीही एखादा प्रचारयंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. या देशाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचे आहे असे आम्ही मानतो आम्हाला करायचे नाही आहे. प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का? हे त्यांनी विचार करायचा आहे. असे संजय राऊत म्हणाले.