शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. सकाळीच ईडीची टीम राऊत यांच्या घरी दाखल झाली. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे.
राऊत यांच्या घरावर छापा पडल्याचं कळताच शिवसैनिकांनी राऊतांच्या बंगल्याबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी (shivsena) राऊत यांच्या घराच्या बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आता संजय राऊत यांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईडीच्या धाडीनंतर साडेतीन तासानंतर संजय राऊत यांचे वकिल विकास साबणे हे मैत्री बंगल्यावर पोहचले आहेत. वकील साबणे यांनी सांगितले की, पंचनामा केला असेल काही डॉक्यूमेंट सही करायचे आहेत. अर्ज रेकॉर्डवर आहे. ते अंडर टेकिंग आहे, आम्ही सहकार्य करत आहोत. सहकार्य केलं नाही असा प्रश्नच नाही. जवळपास गेल्या 4 तासांपासून राऊतांच्या घराची झडती ही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जातंय. या धाडीसाठी ईडीचे तब्बल दहा अधिकारी राऊतांच्या बंगल्यावर आहेत, बाहेर सुरक्षारक्षकांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आलायं.