सांगलीत महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. आम्ही तिथे दोन दिवस प्रचारासाठी गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रसने सांगलित मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे विशाल पाटील किंवा काँग्रेसचे अन्य प्रमुख नेत्यांसोबत आम्ही चर्चा करू. महाविकास आघाडीत कोणतेच मदभेत नाहीत, असं म्हणत राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, जागावाटपाबाबत, रणनीतीसंदर्भात उद्या पत्रकार परिषद होणार आहे. मविआत कोणतेही मतभेद नाहीत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, एखाद- दुसऱ्या जागेवरून आग्रह असतो. प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढणे हा त्यावरचा उपाय असतो. रामटेक संदर्भात आमच्या लोकांचा आग्रह होता. कोल्हापूर, अमरावती संदर्भात असेल, कार्यकर्त्यांचा हट्ट होता आणि आजही आहे. आमच्या लोकांनी जाहीर विधाने केली नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुढील काळात संयमाची भूमिका घेण्याचं ठरवलं आहे.
उद्या शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि घटकपक्षाचे सर्व नेते येतील. आपचे नेते येतील.आपसुद्धा आमच्यासोबत आहे. सांगलीच्या जागेबाबत कोणताही वाद नाही. विशाल पाटील काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाच्या आशा-अपेक्षा असतात. त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, असंही राऊत म्हणाले.