महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानांविरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा पार पडला. यावरच आता संजय राऊत स्वतःला स्टार प्रचारक समजतात. ते मोर्च्याला चालले नाही तर शूटिंगला चालले आहेत असं म्हणत शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे.
संजय राऊतांवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत स्वतःला स्टार प्रचारक समजतात. ते मोर्च्याला चालले नाही तर शूटिंगला चालले आहेत. कॅमेरा आपल्यावर कसा असावा आणि मी मोर्चामध्ये जाण्यासाठी घरातून मेकअप करून निघाले आहेत. संजय राऊत यांनी बेताल व्यक्तव्य केली. त्यांच्याबद्दल बोलायची आम्हाला लाज वाटत आहे. असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांनी मोर्चा काढला असला तरी, त्यांची मतं मात्र वेगळी आहेत. अनेक लोक मोर्चापासुन पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या मोर्चात सहभागी व्हायचं नव्हतं. पण त्यांना जबरदस्तीने आणलं गेलं आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
आज जे मोर्चा काढत आहेत, यांनीच आदिवासीवर गोळीबार केला. याच लोकांनी ओबीसी आरक्षणाला खोड घातली आहे. याच लोकांनी दलित सवर्ण वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळेस तब्बल अठरा वर्ष घडवला होता. आज जे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यामध्ये 90 टक्के मराठा समाजाचे लोक आहेत. त्यांच्याकडे यांचं लक्ष नाही. महाविकासच्या लोकांना आता लोकांमध्ये स्थान राहिले नाही, ते आता संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही शिरसाट म्हणालेत.