मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात सध्या शिवसेनेमध्ये (Shivsena) मोठी खलबतं सुरु आहे. यावरुनच आज काही मराठा संघटनांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) हे सध्या खासदारकीसाठी इच्छुक असून, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. संभाजी राजेंनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली असून, शिवसेनेत आल्यास खासदारकीबद्दल विचार करु अशी शिवसेनेची भुमिका असल्याचं समजतंय. याबद्दल बोलताना संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सहावी जागा ही सेनेची आहे आणि सेनेचा उमेदवार त्या जागेवरुन लढेल आणि विजयी होईल असं संजय राऊत म्हणाले.
राज्यसभेबाबतच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला माहिती आहे. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच आजच्या बैठकीत फक्त त्याच विषयावर चर्चा झाली असं नसून, बाकी विषयांवर देखील चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. या बैठकीत काही आमदार, खासदार विनायक राऊत हे लोक सुद्धा होते. मराठा संघटनांचं काही म्हणणं आहे, छत्रपतींचंही काही म्हणणं आहे आणि सेनेचा पण काही मुद्दा आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच राज्यसभेची सहावी जागा सेनेची आहे, आणि सेनेचा उमेदवार त्या जागेवरुन लढेल आणि विजयी होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की, दुसऱ्या जागेवरुन शिवसेनेचाच उमेदवार निवडून जाईल. छत्रपती हे आमचेच आहे, त्यांचे आमचं एक नाते आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे की सेनेमध्ये या आणि मग मुख्यमंत्री त्या जागेबाबत निर्णय घेतील. यात कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रश्न नाही, कारण जागा शिवसेनेची आहे. आम्हाला राज्यसभेत आमची एक जागा वाढवायची आहे. मागच्या वेळेला राष्ट्रवादीनं आपली एक जागा वाढवली. पुढच्या वेळी दुसरा पक्ष जागा वाढवेल असं संजय राऊतांनी सांगितलं. तर कुठल्याही एका पक्षाकडून नाही तर महाविकास आघाडीकडून आपल्याला राज्यसभेवर पाठवावं अशी संभाजी राजेंची इच्छा असल्याचं समजतंय.
संजय राऊत यांनी सांगितलं की, शिवसेना हा शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठिंब्यावर ठाम आहे. दुसऱ्या जागेबद्दल बोलताना संजय राऊतांनी सांगितलं की, चर्चेत खूप नावं असतात. चर्चा होत राहते, मात्र मुख्यमंत्रीच अंतीम निर्णय जाहीर होईल.