मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) रविवारी अटक करण्यात आली. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यावेळी राऊतांचे कुटुंबिय अत्यंत भावूक झाले होते. त्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज संजय राऊतांच्या घरी गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही अत्यंत वाईट पद्धतीनं केली जात असून, संजय राऊत यांच्या हिंमतीचा आपल्याला अभिमान वाटतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधकांना वाटेल ते करुन अडकवायचं आणि संपवण्याचा प्रयत्न करायचा असं राजकारण भाजपकडून होतोय. मात्र काळ बदलत असतो, 60 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसची अवस्था आज काय आहे हे पाहून लक्षात घ्यायला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय राऊत यांनी आजपर्यंत शिवसेनेच्या विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या ज्या वेळी संकट आलं त्यावेळी संजय राऊत हे त्यांच्यासाठी उभे होते. त्यामुळे आता संजय राऊतांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार का? असा सवाल उपस्थित होत होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यांच्या घरी जात, त्यांच्या कुटुंबाला धीर दिला आणि स्पष्ट केलं की या प्रकरणात आपण आणि आपला पक्ष संजय राऊत यांच्या कुटुंबासोबत आहोत. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी अत्यंत गंभीर आरोप भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर केले आहे. मी सुद्धा मुख्यमंत्री झालो होतो, मात्र माझ्या डोक्यात कधी ती हवा गेले नाही. त्यामुळे आज जे लोक सत्तेत आहेत, त्यांनाही मी हेच सांगेल की, सत्तेची नशा होऊ देऊ नका.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आता भाजपचे नेते जे. पी. नड्डा यांनी केलेलं हे वक्तव्य हे पोटातलं ओठावर आलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांचा खरा हेतू समोर आला आहे. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत घातक आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. संजय राऊत हा माझा जुना मित्र आहे, आमचे कौटुंबिक संंबंध आहेत. झुकेगा नही हे चित्रपटात बोलणं सोपं आहे, मात्र ते खरंच झुकले नाहीत. मरण आलं तरी शरण जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.