किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज ठाकरे परिवारावर पुन्हा आरोप केले. मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. या कंपनीत 29 कोटी रुपये काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे. ठाकरे परिवाराशी व्यावहारिक संबंध असलेल्या हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींना (Nandkishor Chaturvedi) कुठं लपवलं? असा सवाल करत सोमय्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर आता नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
किरीट सोमय्या हे आरोपी आहेत.विक्रांत निधी घोटाळ्यातील ते आरोपी आहेत, ते आणि त्यांच्या मुलाला अंतरिम जामीनावर सुटका दिली आहे. हा घोटाळा झाल्याचं राजभवनानं मान्य केलं. पैसे भाजपच्या तिजोरीत टाकल्याचं आरोपी स्वत: सांगत आहेत. ते जे आरोप उद्धव ठाकरेंवर करत आहेत, ते स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी करत आहेत असं संजय राऊत यांनी सांगितलं.
एवढ्यावरच न थांबता ते म्हणाले, उद्या दाऊद इब्राहीम पाकिस्तानातून म्हणेल की मुंबईत दहशतवाद वाढला आहे, तसं सोमय्यांचं आहे. विक्रांत घोटाळ्याचे पुरावे स्पष्ट आहे. विक्रांत घोटाळ्यामध्ये पैसे जमा केले आणि त्या पैशामध्ये बेईमानी केली असा निष्कर्ष सत्र न्यायालयाने काढल्यानंतर त्यांचा जामीन नाकारला होता. मात्र हायकोर्टात जाऊन दिलासा घोटाळ्याचे ते आरोपी ठरले असा आरोप संजय राऊत यांनी केला.