तासगाव | संजय देसाई : तासगावच्या एका दाम्पत्याचं बाळ जन्मल्याचं दु:ख चोवीस तासाच्या आतच एका चोर महिलेनं हिरावून घेतलं होतं. अवघ्या एका दिवसाच्या बाळाचं एका महिलेनं आज सकाळी अपहरण केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि महिलेसह बाळाचा काही तासातच शोध लावला. महिलेला अटक करत बाळाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. खाजगी रुग्णालयामध्ये महिलेच्या प्रसूतीनंतर तिच्या बाळाचं अपहरण झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी तासगाव मध्ये घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील नर्सने हा प्रकार केल्याचा समोर आलं आहे.
तासगाव शहरातल्या सिद्धेश्वर चौक या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर अंजली पाटील यांच्या रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या एका महिलेच्या अवघ्या एक दिवसाच्या बाळाचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. सदरची महिला हे बाळाला एका बॅगमध्ये घालून रुग्णालयामधून बाहेर पडल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. त्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. सांगली पोलीस दलानं, त्या बाळाचा आणि महिलेचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं रवाना केली होती.
पोलिसांनी अवघ्या सहा ते सात तासांमध्ये महिलेचा शोध घेत, सातारा जिल्ह्यातील भवानीनगर इथल्या शेणोली रेल्वे स्थानकाजवळ या महिलेला ताब्यात घेण्यात आलं. तिच्याकडून बाळ देखील ताब्यात घेण्यात आलं. स्वाती माने असं या अपहरण करणाऱ्या महिलांचं नाव असून, सध्या ही महिला वाळव्यात राहते. तर ती महिला मूळ सोलापूर जिल्ह्यातील आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी नर्स म्हणून स्वाती माने ही नोकरीला लागली होती. रुग्णालयात नर्स म्हणून काम करण्याचा फायदा घेत प्रसुती झालेल्या महिलेच्या एक दिवसाच्या बाळाचं अपहरण केलं आणि तिथून पलायन केलं होतं.
दरम्यान, तासगाव पोलिसांकडून या महिलेची कसून चौकशी सुरू असून, तिनं हे अपहरण नेमकं कोणत्या कारणाने केलं? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत. मात्र अवघ्या एका दिवसाच्या बाळाच्या अपहरणाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.