महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. अशातच आता अन्न, नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. स्वत: छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना तसे संकेत दिले आहेत.
"नाशिक जिल्ह्याच्या विकासकार्यात मला खंबीरपणे साथ देणारे माजी खासदार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करतानाच कुटुंबातील जबाबदाऱ्याही ते सक्षमपणे सांभाळत आले आहेत. त्यांची अभ्यासू व मेहनती वृत्ती, नाविन्याचा ध्यास आणि दूरदृष्टी या गुणांमुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आजवर कामाचा ठसा उमटविला आहे. आगामी काळातही ते अशाच पद्धतीने ताकदीने काम करत जनतेने दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास आहे. समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव - मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!" अशी पोस्ट करत छगन भुजबळांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या शिवसेनेचे सुहास कांदे हे नांदगावचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे नांदगावच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.