ठाकरे गटाच्या अग्रलेख सामनातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. राज्यासह देशात रामनवमीच्या निमित्ताने जे घडले ते ‘रामनाम सत्य’ नसून रामनामाची बदनामी आहे. राम हे मर्यादापुरुषोत्तम होते, पण त्यांच्या नावाने दंगा करणाऱ्यांनी मर्यादाच ओलांडल्या.सगळं काही शांततेत सुरु असताना पुन्हा रामाच्या नावाने महाराष्ट्रात हिंसा का भडकवली जातेय. दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची दळभद्री योजना आहे. असे म्हणत सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
तसेच दोन गटांतील वादानंतर मुस्लिमांच्या जमावाने राममंदिरासमोरच धुमाकूळ घातला. पोलिसांची वाहने जाळली. राममंदिराजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, पण हे असे अचानक का घडले? की सर्व काही पूर्वनियोजित व ठरल्याप्रमाणे घडले? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
देश लुटणाऱ्या अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे. राम हे हिंदुस्थानचे महानायक मानले जातात. त्या महानायकाचा जन्मदिवस दंगलीसाठी ओळखला जावा हे त्या महानायकाचे दुर्दैव म्हणावे लागेल. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.