चेपॉक स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूत ९ चौकार मारून ६७ धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने १७.४ षटकात कोलकाताने दिलेलं १३७ धावांचं लक्ष्य गाठलं. सीएसकेनं केकेआरचा ७ विकेट्सने पराभव केला. कोलकाता विरोधात अर्धशतकी खेळी करून गायकवाडने मोठा कारनाम केला आहे. चेन्नईसाठी आयपीएलमध्ये पाच वर्षांनंतर अर्धशतक ठोकणारा ऋतुराज पहिला कर्णधार ठरला आहे.
२०१९ मध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून सीएसकेसाठी अर्धशतक ठोकलं होतं. धोनीने २०२२ मध्येही अर्धशतक ठोकलं होतं. परंतु, जडेजा कर्णधार असताना धोनीनं अर्धशतक ठोकलं होतं.चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडेच्या भेदक माऱ्यामुळं कोलकाताचा डाव १३७ धावांवर आटोपला.
चेपॉकच्या धिम्या खेळपट्टीवर केकेआरच्या केकेआरच्या फलंदाजांची दांडी गुल झाली. सलामीचा फलंदाज फिल सॉल्ट पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर सुनील नरेन आणि अंगकृष रघुवंशीने दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागिदारी करुन डाव सावरला. सुनीलने २० चेंडूत २७ आणि रघुवंशीने १८ चेंडूत २४ धावा केल्या. परंतु, या दोघांची विकेट गेल्यावर कोलकाताच्या संपूर्ण संघाची पुरती दमछाक झाली.