नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीतील मुस्लिम विचारवंत आणि इमामांची भेट घेतली. यासाठी ते कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत दिवंगत मौलाना जमील इलियासी यांच्या समाधीवर पोहोचले. यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.
मोहन भागवत यांनी दिवंगत मौलाना जमील इलियासी यांच्या मजारवर पुष्प अर्पण केले. ते डॉक्टर जमील इलियासी यांच्या जयंतीनिमित्त येथे पोहोचले होते. त्यांच्यासोबत संघाचे इंद्रेश, रामलाल आणि कृष्ण गोपाल उपस्थित होते. या बैठकीला इमाम उमर इलियासी आणि शोएब इलियासीही उपस्थित होते. डॉ इमाम उमर इलियासी हे ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख आहेत. मोहन भागवत सुमारे तासभर मशिदीत होते. या भेटीवर डॉ जमील इलियासी यांचा मुलगा शोएब इलियासी म्हणाले की, मोहन भागवत यांचे आगमन हा देशासाठी मोठा संदेश आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, आरएसएसने अलीकडे मुस्लिमांशी संपर्क वाढवला आहे आणि भागवत यांनी समाजाच्या नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. गेल्या वर्षीही त्यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुस्लिम विचारवंतांच्या गटाची बैठक घेतली होती. सप्टेंबर 2019 मध्ये, भागवत यांनी दिल्लीतील आरएसएस कार्यालयात जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना सय्यद अर्शद मदनी यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील काही विचारवंतांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती. यादरम्यानहिंदू-मुस्लिम यांच्यात सलोख्यासाठी काम करण्याचे मान्य करण्यात आले आहे.