पेपरफुटीच्या मुद्द्यावरून अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहेत. प्रत्येक परीक्षेत घोटाळे होत असल्याचा विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. पेपरफुटीबाबत कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले की, राज्यात #पेपरफुटीमुळे युवांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे अन् राज्याचे गृहमंत्री सभागृहात म्हणतात की पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का?
यासोबतच रोहित पवार पुढे म्हणाले की, पेपरच फुटले नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? नेमकं गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही कुणाला वाचवण्यासाठी खोटं बोलत आहात? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राज्यातील युवा तुमच्याकडे मागणारच आम्ही युवांसोबत आहोत. काहीही झालं तरी या अधिवेशनात #पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करावाच लागेल. असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.