Rohit Pawar On Ajit Pawar 
ताज्या बातम्या

"अजितदादा म्हणतात तुम्ही अजून बच्चे आहात, पण..."; शेतकरी मेळाव्यात रोहित पवारांनी विरोधकांवर डागली तोफ

Published by : Naresh Shende

दिल्लीला तुम्ही पद मागण्यासाठी लोटांगण घालता, पण शेतकऱ्यांसाठी तुम्हाला लोटांगण घालता येत नाही. कुटुंब फोडायला, पक्ष फोडायला तुम्हाला अटी लागत नाहीत. पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला अटी लागतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही अधिवेशनात मुद्दा मांडत होतो. देवेंद्र फडणवीस म्हणतात, तुम्ही या प्रश्नांबाबत गंभीर नाहीत. अजितदादांना हा मुद्दा सांगितला, तर ते म्हणतात, तुम्ही अजून बच्चे आहात. शेतकऱ्यांसाठी आम्ही हे मुद्दे मांडले, तर आम्ही लहान झालो का? शेतकऱ्यांचे मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटत नाहीत का? या सरकारने आपल्याला काय दिलंय? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते दौंड येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

जनतेशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, विरोधकांचं काही करायचं असेल, तर आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातूनच करावं लागेल. ती वेळ आता या लोकसभेत आली आहे. आम्ही विकासासाठी गेलो, असं हे नेते म्हणतात. पण ते हे सांगत नाहीत, की कोणाच्या विकासासाठी आम्ही गेलो. आज आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत आहे. त्यांना सरकारकडून जी काही मदत वेळेवर मिळायला पाहिजे होती, ती मदत मिळाली नाही. पूर्वीच्या काळात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सरकार चालत होतं, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार केंद्रात आणि राज्यात होतं. त्यावेळी कांद्याचे भाव वाढत होते.

कांद्याच्या भावावर शेतकऱ्याचं कुटुंब टिकतं आणि शेतकऱ्यासाठी मी कोणताही निर्णय बदलणार नाही. कांदा शंभर रुपयाला गेला तरी चालेल, अशी भूमिका शरद पवार यांनी त्यावेळी घेतली होती. आज काय परिस्थिती आहे, कांदा आपण शेतात लावला होता. या कांद्याला ३०-४० रुपये किंमत मिळेल, शेतकऱ्यांनी अनेक स्वप्न पाहिलं होतं. पण केंद्राने काय निर्णय घेतला, कांदा निर्यात बंद...या गोष्टींचा नेत्यांना, सरकारला फरक पडला का? शेतकऱ्यांच्या विकासाचा प्रश्न त्यांना पडला का? असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी विरोधकांचा समाचार घेतला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू