Rohit Pawar On Union Budget : देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला. परंतु, या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली असून राष्ट्रवादी काँग्रसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका केलीय. केंद्राकडे सर्वाधिक टॅक्स महाराष्ट्र देतो, पण केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र काहीच येत नाही. त्यामुळंच आज महाराष्ट्राची अवस्था दयनीय झालीय, असं ट्वीट करत पवारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.
आमदार रोहित पवार ट्वीटरवर काय म्हणाले?
"काल मंत्रिमंडळ बैठकीत निधी नसल्याने मंत्र्यांमध्ये वादावादी होत असताना अर्थमंत्र्यांनी उद्विग्न होऊन जमिनी विकून निधी देऊ का, असं वक्तव्य केल्याचं समोर आलं. देशाला सर्वाधिक टॅक्स देणाऱ्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती का उद्भवली?
केंद्राकडे सर्वाधिक टॅक्स महाराष्ट्र देतो, पण केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र काहीच येत नाही. त्यामुळंच आज महाराष्ट्राची अवस्था दयनीय झालीय. कालचं बजेट बघता ‘देशाची तिजोरी महाराष्ट्र भरी आणि महाराष्ट्राच्या मात्र हातावर तुरी’ असं म्हणायची आज वेळ आलीय. असो! सत्तेसाठी दिल्लीसमोर लाचारी करणं, हाच सत्ताधाऱ्यांचा राजधर्म असावा !"